विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱे व पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यु, पाच जखमी, एक गंभीर, तर घराचे नुकसान 

पालघर : विशेष आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारपासून जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या तीव्र गडगडाटासह सुरु झालेल्या वादळी पावसा वीज कोसळून वाडा तालुक्यातील  मौजे अंबिस्ते खुर्द येथे सागर शांताराम दिवा वय 17 वर्षं (अंदाजे) या युवकावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ४ व्यक्ती जखमी झालेल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर डहाणू तालुक्यातील तवा नमपाडा येथील नितेश हळ्या तुंबडा (२१) याचा ही वीज कोसळल्याने मृत्यु झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे. 

मौजे कंबारे येथे घराचे वादळी वाऱ्या मुळे पत्रे उडून गेले, सुदैवाने कोणती ही जीवित हानी झालेली  नाही. आज दि. 6 रोजी, दुपारपासून पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी भागात विजांच्या गडगडाटासह, आलेला सोसाट्याचा वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवीत हानी झाली आहे. डहाणू तालुक्यातील तवा नमपाडा येथील नितेश हळ्या तुंबडा आणि वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथिल सागर शांताराम दिवा या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. मयत नितेश आणि अनिल सुधाकर धिंडा (18) हे तवा येथील साई मंदिरा शेजारील मैदानावर उभे होते. दरम्यान सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास या दोघांवर वीज कोसळल्याने  नितेशचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल हा गंभीर जखमी झाला असून, धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची स्थिती गंभीर असून कासा पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून मदत करित आहेत व परिस्थितिवर लक्ष ठेवून आहेत. 

याच दरम्यान वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथे 3:30 वाजताच्या सुमारास एका वस्तीत बसलेल्या 6 जणांवर वीज कोसळल्याने यातील सागर शांताराम दिवा (17) या युवकाचा जागीच मृत्यू असून, संदीप अंकुश दिवा (25), अनंता चंद्रकांत वाघ (24), रवींद्र माधव पवार (18), नितेश मनोहर दिवा (19) व सनी बाळू पवार (18 ) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे  सांगण्यात येत आहे.