पालघर, दि. ४- जिल्ह्यात मागील दोन दिवसात होत असलेली अतिवृष्टी आणि धरणांतील पाण्याचा होत असलेला विसर्ग यामुळे नद्या, नाले, ओहळ यांच्या पातळीत वाढ झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासन दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आज जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत कार्याप्रसंगी स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीतून ८०० हून अधिक व्यक्तींची सुटका केली.

जिल्ह्यालगतच्या मोडकसागर धरणातून आज सकाळी ११२५३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वैतरणा नदीमध्ये सोडण्यात आला होता. तसेच तानसा धरणामधून ४२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तानसा नदीमध्ये करण्यात आल्यामुळे वसई, वाडा व पालघर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमधून रहिवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ चे २० जवान व दोन बोटी, भारतीय तटरक्षक दलाचे नऊ जवान व एक बोट यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने तसेच महसूल, पोलीस विभाग, वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल आणि स्थानिकांच्या मदतीने पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली.

            वसई तालुक्यातील मौजे तानसा मोरी येथील १८९ व्यक्ती, मिठागर येथील ४७ व्यक्ती, राजीवली येथील ३०० व्यक्ती, अर्नाळा येथील ८८ व्यक्ती, तर भाताने (नवसई) येथे अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. पेल्हार येथील पुलावर ट्रकमध्ये तीन लोक अडकल्याचे कळताच त्यांचीही सुटका करण्यात आली. उपविभागीय अधिकारी दिपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी यावेळी मदत कार्यात सहभाग घेतला.

            पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे मनोर येथील नंदनवाडी येथे एक कुटूंब तिसऱ्या मजल्यावर अडकले होते. त्यांची स्थानिक लोकांच्या तसेच तटरक्षक दलातील जवानांच्या मदतीने सुटका करण्यात आली. विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथील पिंजाळ नदीचे पाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळच्या ३९ घरांमध्ये शिरले, तेथील १५० जणांना जवळच्या समाजमंदिरात हलविण्यात आले. वाडा तालुक्यातील मौजे बोरांडा येथे १४ लोक अडकले असून त्यांची सुटका करण्याची कार्यवाही सुरू होती.

            डहाणू तालुक्यातील गंजाड सोमनपाडा येथील संजय हरी सोमण या प्राथमिक शिक्षकांचा ३ ऑगस्ट रोजी विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. तसेच खुडेद येथील कुडाचापाडा या ठिकाणी १६ वर्षाचा शाळकरी मुलगा सिताराम शिवराम चौधरी याचा २ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे वसई तालुक्यातील मोरगाव येथे गाडीला धक्का मारत असताना पुराच्या पाण्यात वाहून प्रवीण प्रजापती या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

            आज दुपारी २ वाजेनंतर पावसाचा जोर कमी झालेला आहे. तसेच मोडकसागर व तानसा धरणातून करण्यात येणारा विसर्ग कमी झालेला आहे.

            सद्यस्थितीमध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल व अग्निशामक दल व शासनाचे इतर विभाग आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज आहेत. पात्र मयत व्यक्तींना नियमानुसार मदत देण्याची तसेच पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

            जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विकास गजरे, दिपक क्षीरसागर, तहसीलदार महेश सागर, किरण सुरवसे, जी.श्रीधर यांच्यासह संबंधित कर्मचारी विविध ठिकाणी मदतकार्यप्रसंगी उपस्थित होते. तर, जिल्हा आपत्ती निवारण कक्षात उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, तहसीलदार श्रीमती उज्वला भगत, रेवननाथ लबडे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी देखील सर्व ठिकाणी समन्वय ठेवून मार्गदर्शन केले.

            दरम्यान जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी आणि नद्यांच्या पातळीत झालेली वाढ पाहता रहिवाशांबरोबरच पर्यटकांनी दक्षता घ्यावी, वाहत्या पाण्यात कोणीही जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर

 पालघर, दि. ४- पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.


पालघर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी १९०.०८ मिमी तर

आतापर्यंत सरासरीच्या १४५ टक्के पाऊस

            पालघर, दि. 4- जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सरासरी १९०.०८ मिमी पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण २२५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरी पावसाशी त्याचे प्रमाण १४५.१६ टक्के इतके आहे.

            तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : वसई- २१४.३३ मिमी, वाडा- २५२.८१, डहाणू- ७०.७०, पालघर- २२२.३३, जव्हार- २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी- ८५.६३ आणि विक्रमगड-१८७.८८ मिमी.

            यावर्षी आतापर्यंत वसई तालुक्यात २१५०.४२ मिमी, वाडा- २७१०.५५, डहाणू- १९५८.६५, पालघर- २३५१.१६, जव्हार- २३५१.०१, मोखाडा- २२१४.३९, तलासरी- १९९४.२३ आणि विक्रमगड तालुक्यात- २३४६.१३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणी पातळी ११७ मी. असून पाणीसाठा २५५.२२१ दलघमी म्हणजेच ९२.३५ इतकी आहे. कवडास उन्नैयी बंधाऱ्याची पाणी पातळी ६६.९० मी. तर पाणीसाठा ९.९६ दलघमी असून हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मी. असून पाणीसाठा ३५.९३ दलघमी इतका आहे. हे धरण देखील १०० टक्के भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मी. तर पाणीसाठा ३१.१५ दलघमी म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.

            जिल्ह्यातील सूर्या नदीची (मासवण) पाणी पातळी ७ मीटर असून इशारा पातळी ११ मीटर आहे. वैतरणा नदीची पातळी १०२.०५ मीटर तर इशारा पातळी ११.९० आणि धोका पातळी १०२.१० आहे. पिंजाळ नदीची पातळी १०२.८८ असून इशारा पातळी १०२.७५ तर धोका पातळी १०२.९५ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.